
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील १११ गंगापूर विधानसभा मतदार संघातील दुबार मतदार नोंदणी संदर्भात प्राप्त तक्रारींची यादी ही मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व जिल्ह्याचे संकेतस्थळ येथे उपलब्ध आहेत. या याद्या पाहून दुबार नावे असलेल्या मतदारांनी आपले नाव नेमके कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे, याबाबत पुरव्यांसह दि.३१ ऑक्टोंबर ते दि.१५ नोव्हेंबर या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून फॉर्म ७ भरुन द्यावा, अन्यथा भारतीय लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५० चे कलम २२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल,असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर व तहसिल कार्यालय गंगापूर येथे १११ गंगापूर विधानसभा मतदार संघात दुबार मतदार नोंदणी संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.या तक्रारींबाबत चौकशी व कारवाई करण्यासाठी दि.१० रोजी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली व भारतीय लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५० अन्वये कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. मौजे रांजणगाव शेणपुंजी येथे दि.१३ ते १५ या कालावधीत दुबार मतदारांची पडताळणी व नाव वगळणी याबाबत फॉर्म क्रमांक ७ भरण्यासंदर्भात विशेष शिबीर आयोजीत करण्यात आले. या शिबिरात १५१ मतदारांचे नाव वगळण्यासंदर्भात फॉर्म क्रमांक ७ भरण्यात आले. अन्य मतदारांबाबतही मतदान केंद्र अधिकारी यांच्यामार्फत चौकशी सुरु आहे. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा यासंदर्भात बैठक घेऊन पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी या दुबार मतदारांच्या याद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना उपलब्ध करुन दिल्या असून जे मतदार दिलेल्या पत्त्यावर आढळून आले नाहीत त्याबाबत पंचनामा करावा, असे निर्देश दिले आहेत. तरी गंगापूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी प्राप्त दुबार मतदारांची यादी , तक्रारी जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांचे संकेतस्थळ www.chhatrapatisambhajianagar.maharashtra.gov.in येथे प्रसिद्ध केली आहे.
तसेच याच याद्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सुद्धा देण्यात आल्या आहेत. मतदारांनी या याद्यांचे अवलोकन करावे. आपले नाव त्यात दुबार असल्यास ते नेमक्या कोणत्या ठिकाणी ठेवणे अपेक्षित आहे याबाबत आवश्यक पुराव्यांसह मतदान केंद्र अधिकारी यांच्याकडे दि.३१ ऑक्टोंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत संपर्क साधावा व जेथून नाव वगळावयाचे आहे तेथे फॉर्म नं.७ भरुन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे द्यावा. अन्यथा भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम २२ प्रमाणे कारवाई करण्यात येईल,असे मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुचिता शिंदे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis