
पुणे, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास आळंदीतील देऊळवाड्याच्या गुरू हैबत बाबांच्या पायरी पूजनाने बुधवार (ता. १२ नोव्हेंबर) पासून सुरुवात होणार आहे. या सोहळ्यातील कार्तिक एकादशीची मुख्य पहाट पूजा शनिवारी (ता. १५ नोव्हेंबर) तर माउलींचा संजीवन समाधी दिन सोहळा सोमवारी (ता. १७ नोव्हेंबर) होणार आहे.
पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते बुधवारी (ता. १२) सकाळी सातच्या सुमारास गुरू हैबत बाबांच्या पायरी पूजनाने महाद्वारामध्ये कार्तिक वारी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. १३ आणि १४ ला पहाटे पाच ते सकाळी ११ पर्यंत भाविकांच्या महापूजा होतील. कार्तिक एकादशीला (ता. १५) माउलींच्या संजीवन समाधीवरील पहाट पूजेसाठी मध्यरात्रीपासूनच ११ ब्रह्मवृंदांच्या साथीत पौरोहित्य सुरू होईल. पहाट पूजेनंतर भाविकांच्या महापूजा बंद ठेवण्यात येणार असून समाधी मंदिर दिवसभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी देऊळवाड्यातून बाहेर पडेल. यानंतर पालखी रात्री नऊ वाजता मंदिरात परंपरेनुसार परतल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा आणि त्यानंतर धुपारती होईल.
द्वादशीनिमित्त रविवारी (ता. १६) प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय पूजा पहाटे साडेतीनच्या सुमारास होणार आहे. त्यानंतर मुक्ताबाई मंडपामध्ये काकडा भजन होणार आहे. पहाटे पाच ते सकाळी साडेअकरापर्यंत भाविकांच्या महापूजा होतील. या पूजा माउलींच्या चल पादुकांवर होतील. त्यानंतर दुपारी चार वाजता परंपरेप्रमाणे रथोत्सवासाठी माउलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होणार आहे. पालखी मंदिरात आल्यानंतर रात्री अकरा वाजता फडकरी दिंडीकरी मानकरी यांना देवस्थानतर्फे श्रीफळ प्रसाद देण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु