
जळगाव , 31 ऑक्टोबर (हिं.स.) अवकाळी पावसानं जळगाव जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून या पावसामुळे वेचणीवर आलेला कापूस भिजून निघाला आहे. यामुळे भिजून निघालेल्या कापसाला कमी दर मिळण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.तर अवकाळी पावसापूर्वी वेचून ठेवलेल्या कापसाला योग्य भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पहिल्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ एरंडोल येथील श्री कृपा जिनर्स प्रा.लि.च्या आवारात झाला. ८,०६० रुपये दराने खरेदी करण्यात आली. दिवसभरात १५ क्विंटल ५० किलो कापसाची खरेदी झाली.धरणगाव बाजार समितीचे सभापती प्रेमराज पाटील यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले. यावेळी श्री कृपा जिनर्स प्रा.लि.चे संचालक संजय काबरे, उपसभापती सुदाम पाटील, सचिव नवनाथ तायडे, उपसचिव मोरेश्वर पाटील, मिलिंद दाभाडे, सीसीआय केंद्रप्रमुख योगेश थाळनेरकर, सायन जना, ग्रेडर ईश्वर शर्मा या मान्यवरांची उपस्थिती होती. शुभारंभप्रसंगी शेतकरी रमेश शांताराम महाजन यांना पहिल्या कापूस विक्रीचा मान मिळाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर