
छत्रपती संभाजीनगर, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। स्वातंत्र्य लढा व स्वातंत्र्यानंतर अखंड भारत निर्माणात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या या दृढनिश्चय आणि समर्पित योगदानाचे स्मरण करीत आपण प्रत्येक जण देशाच्या एकात्मतेसाठी सदैव कटीबद्ध राहू या, असे आवाहन राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण, अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे यांनी केले.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने एकता पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेचा समारोप शहागंज येथील उद्यानात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवार, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य) आश्विनी लाठकर, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई तसेच अन्य अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
पदयात्रा सकाळी ७.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयापासुन सुरु झाली. तेथून ‘भारत माता की जय’, ‘सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे’, अशा घोषणा देत ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालय ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा, शहागंज येथे आली. तेथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. येथे उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली. तसेच स्वदेशी वस्तू वापराबाबत शपथ देण्यात आली. यावेळी खा. डॉ. भागवत कराड यांनी सरदार पटेल यांच्या राष्ट्र उभारणीतील योगदानाची उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर मंत्री अतुल सावे यांनी उपस्थितांना संबोधित केले व सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या एकात्मतेसाठी कटीबद्ध राहण्याचे आवाहन केले.
या रॅलीत सर्व शासकीय कर्मचारी- अधिकारी, राजकीय- सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा संघटना, सामाजि संघटना यांनी या पदयात्रेत सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis