
रत्नागिरी, 31 ऑक्टोबर, (हिं. स.) : साईश्री नृत्य कलामंदिर संस्थेच्या संस्थापिका मिताली भिडे यांनी डी. वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) येथून एम. ए. इन डान्स (भरतनाट्यम्) ही पदवी ए+ श्रेणी व आणि प्रथम श्रेणी गुणांसह संपादन केली आहे. रत्नागिरीमध्ये प्रथमच भरतनाट्यमची कला रुजवण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
गुरू स्वाती दैठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर भिडे यांनी रत्नागिरी- पुणे-रत्नागिरी असा सतत प्रवास करून दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यांच्या या यशाबद्दल साईश्री परिवाराकडून आणि त्यांच्या शिष्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
साईश्री नृत्य कलामंदिर ही संस्था गेल्या २६ वर्षांपासून रत्नागिरीत कार्यरत आहे. या संस्थेतून अनेक विद्यार्थिनींनी विशारद पदवी मिळवली आहे. अनेक विद्यार्थिनींचे अरंगेत्रमही यशस्वीरीत्या झाले आहेत. सतत नवनवीन शिकण्याचा ध्यास आणि त्यांच्या अनुभवातून शिष्यांना मिळणारी प्रेरणा हीच साईश्री संस्थेच्या व मिताली भिडे यांच्या यशामागची खरी प्रेरक शक्ती ठरली आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी