
परभणी, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
पाथरी येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते यांच्या विरुध्द बहुतांशी संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला.
गेल्या काही महिन्यांपासून नखाते यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्या संदर्भात हालचाली सुरु होत्या. मध्यंतरी त्या संबंधीचा ठरावसुध्दा दाखल होणार होता. परंतु, पुरेसे संख्याबळ न जोडले गेल्याने ठराव येण्यापूर्वीच बारगळला. मात्र, माजी आमदार व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या उपस्थितीत बहुतांशी संचालकांनी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला.
संचालकांनी सादर केलेल्या अविश्वास प्रस्तावात मनमानी पद्धतीने कामकाज करणे, बाजार समितीच्या हिताच्या निर्णयांकडे दुर्लक्ष करणे, स्वतःच्या कुटुंबियांना योजनांचे लाभ मिळवून देणे आणि संचालकांचा विश्वास गमावणे आदी कारणे नमूद करण्यात आली आहेत. या प्रस्तावावर माजी आमदार दुर्राणी व सईद खान यांच्या गटातील संचालकांनी स्वाक्षर्या केल्या आहेत. त्यामध्ये एकनाथ घांडगे, किरण टाकळकर, संतोष गल्बे, संजीव सत्वधर, गणेश दुगाणे, शेख दस्तगीर शेख हसन, शाम धर्मे, विजयकुमार शिताफळे, अशोक आरबाड, संदिप टेंगसे, आनंद धनले आणि सयद गालीब सयद इस्माईल यांचा समावेश आहे.
या अविश्वास ठरावामुळे पाथरी बाजार समितीतीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis