
रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आज नेरळ पोलीस ठाण्यात राष्ट्रीय एकता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत मा. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांनुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरली “एकता दौड” — सकाळी आठ वाजता नेरळ पोलीस ठाण्यापासून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी चौक, खांडा, टीवळे नाका असा मार्गक्रमण करत पुन्हा पोलिस ठाण्यात समारोप करण्यात आला. या दौडमध्ये एकता आणि राष्ट्रभावना यांचा संदेश देत पोलीस अधिकारी व कर्मचारी नम्रता कांदळगावकर व इतर नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी पांढरा टी-शर्ट परिधान करत एकता आणि शिस्तीचे प्रतीकात्मक दर्शन घडविले. “एक भारत, श्रेष्ठ भारत” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दौडनंतर राष्ट्रीय एकता व अंतर्गत सुरक्षा या विषयावर अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचे स्मरण करत, देशाच्या एकतेसाठी त्यांच्या योगदानाची प्रेरणा घेऊन पोलीस दलाने राष्ट्रीय एकात्मतेचा संकल्प केला. समाजात सौहार्द, अनुशासन व राष्ट्रप्रेम वाढविण्याच्या हेतूने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके