पशुवैद्यकीय सेवांना मिळणार स्वतंत्र दर्जा
पुणे, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये पशुवैद्यकीय सेवांना स्वतंत्र स्वरूप देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने व्यापक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोग्य विभागांतर्गत चालणाऱ्या पशुवैद्यकीय कामकाजाला आत
पशुवैद्यकीय सेवांना मिळणार स्वतंत्र दर्जा


पुणे, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये पशुवैद्यकीय सेवांना स्वतंत्र स्वरूप देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने व्यापक कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोग्य विभागांतर्गत चालणाऱ्या पशुवैद्यकीय कामकाजाला आता स्वतंत्र ओळख, पदनिर्मिती आणि नियमबद्ध जबाबदाऱ्या देण्याची शिफारस यामध्ये असेल. या दिशेने पशुसंवर्धन आयुक्तालयाने प्राथमिक टप्प्यातील कामकाज सुरू केले आहे.

गेल्या काही वर्षांत शहरी भागात पाळीव प्राण्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषतः श्‍वान, मांजर, ससा, विविध जातींचे पक्षी आणि इतर पाळीव प्राणी हे शहरांमध्ये वास्तव्याचा भाग झाले आहेत. दुसरीकडे, भटक्या जनावरांचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर फिरणाऱ्या श्‍वानांच्या टोळ्या, त्यामुळे होणारे अपघात, तसेच रेबिजसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेली मोहीम, या सर्वांमुळे महापालिकांमध्ये प्रशिक्षित आणि स्वतंत्र पशुवैद्यकीय व्यवस्था उभी राहणे आवश्यक ठरणार आहे. सध्या बहुतेक महापालिकांमध्ये पशुवैद्यकीय कामकाज आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली चालते. त्यात कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असून, कामाचे स्वरूप व्यापक आहे; परंतु शहरांतील प्राण्यांचे आरोग्य, लसीकरण, नियंत्रण, नोंदणी, जनजागृती, तसेच प्राणी कल्याणाशी संबंधित मुद्दे यासाठी स्वतंत्र आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या आवश्यक असल्याचे पशुसंवर्धन विभागाच्या निदर्शनास आले आहे. पशुसंवर्धन विभागाची ही कार्यप्रणाली तयार करताना महापालिकेतील सद्यःस्थितीचा अभ्यास यामध्ये असेल. कोणत्या शहरात किती पाळीव प्राणी आहेत, भटक्या प्राण्यांचे प्रमाण किती आहे, असे सर्वंकष मूल्यमापन होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande