
पुणे, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
पुण्यालगत पुरंदर तालुक्यात नवे विमानतळ उभारण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासानकडून सुरू आहेत. दरम्यान, नव्या विमानतळाच्या निर्णयानंतर या परिसरातील जागांचे दर गगनाला भिडले आहेत. या परिसरात होणारे अवैध व अनिधकृत प्लॉटिंग रोखणे, नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्लॉटिंगचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये अनियमितता आढळल्यास पीएमआरडीएच्या वतीने संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणअंतर्गत पुरंदर तालुक्यात 15 गावांचा समावेश आहे. त्यातील 3 गावांचे नियोजित विमानतळासाठी भूसंपादन केले जाणार आहे. दरम्यान, आणखी जवळपास दीडशे हेक्टर जमिनीचे नव्याने भूसंपादनाची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. याबाबत प्रक्रिया सुरू असतानाच, विमानतळाच्या नावाखाली या परिसरात प्लॉटिंग व्यवसाय वाढू लागला आहे. त्यामुळे या टप्प्यातील जमिनीचे भावदेखील वाढले आहेत. अशावेळी नागरिकांची फसणवूक होण्याची शक्यता आहे. तसेच, याबाबत जिल्हा प्रशासनाकडे स्थानिकांनी तक्रारी केल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु