
रत्नागिरी, 31 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रारंभ आज उत्साहपूर्ण आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात ॲड. योगेश गुरव यांनी प्रास्ताविकाने केली. नूतनीकरणाचा प्रारंभ उद्योगमंत्री व मराठी भाषा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला. त्यांनी आपल्या भाषणात वकील संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम कटिबद्ध राहून सेवा देत राहण्याचे आश्वासन दिले. न्याय व नागरिकहिताच्या दृष्टीने उभारणी केलेले अशा प्रकारचे उपक्रम न्यायव्यवस्थेला बळकटी देतात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड विलास पाटणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनीही या नूतनीकरण उपक्रमाचे स्वागत करत, कामकाज अधिक सुकर व जनहितमुखी होईल, असा विश्वास व्यक्त केला. कोकण कमिशनर आणि एएलटीचे कॅम्प रत्नागिरीत होणे गरजेचे आहे .तसेच वकिलांच्या हॉलकरिता १५० खुर्च्यांची गरज आहे, असे त्यांनी सांगताच उदय सामंत यांनी तत्काळ मान्यता दिली तसेच कमिशनर आणि वकिलांची संयुक्त मीटिंग घेण्याचे घोषित केले .
नूतनीकरणानंतर आयोगाची इमारत अधिक आधुनिक, सुरक्षित, सुबक आणि कार्यक्षम होणार असून नागरिकांना तक्रार नोंदविण्यासाठी आणि निवारण प्रक्रियेसाठी आणखी सुधारित सुविधा मिळतील, अशी माहिती आयोजकांनी दिली.
यावेळी ॲड. अशोक कदम, ॲड. माधव भाटवडेकर.ॲड. विजय साखळकर, ॲड. राजशेखर मलुष्टे, ॲड. शाल्मली आंबुलकर, ॲड. अवधूत कळंबटे, ॲड. निनाद शिंदे ॲड. प्रफुल्ल साळवी आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरी बार असोसिएशनचे सचिव ॲड. रत्नदीप चाचले आभार मानले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी