
रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। रोहा शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांना सुरुवात झाली आहे. “रोहा बदलतोय” या घोषणा घोषात रविवारी झालेल्या शिवसेना (शिंदे गट) च्या सभेत मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे रोह्याच्या राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली आहे.
सभेला राज्याचे उद्योग मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी प्रमुख उपस्थित होते. या वेळी मंत्री गोगावले म्हणाले, “आता पर्यंत ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते दिल्लीच्या वाटेवर निघाले आहेत. त्यांची बॅग भरली आहे, फक्त काही दिवस बाकी आहेत. आम्ही बोलत नाही, करून दाखवतो,” असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यावर लगावला.
गोगावले पुढे म्हणाले की, शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. “एकदा संधी द्या, जेवढं तटकरेनी रोह्याला दिलं त्या पेक्षा पाचपट मी देईन,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सभेत आमदार महेंद्र दळवी यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “रोह्याची सभा दिशा दर्शक ठरणार आहे. अनेक स्थानिक नेते आता ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. येत्या काळात अनेक मोठे प्रवेश पाहायला मिळतील,” असे ते म्हणाले. या सभेत उपस्थित मुस्लिम बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
--------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके