
परभणी, 31 ऑक्टोबर (हिं.स.)।
जिंतूर तालुक्यातील बोरी येथे परभणी रोडवर झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात दोन पुरुष आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील सर्व जखमींना उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूरहून परभणीकडे प्रवाशांना घेऊन जाणारा ऑटो (एम एच २२ एपी ४३६७) आणि परभणीहून जिंतूरकडे जाणारी स्विफ्ट कार (एम एच १६ बीसी ०८७९) यांच्यात बोरी येथील नायरा पेट्रोल पंपासमोर समोरासमोर धडक झाली. त्याचवेळी रस्त्यावर एक मालवाहू ऑटो (एमएच १५ डीके ५०६१) उभा होता. प्रवासी ऑटो मालवाहू ऑटोला ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले.
या भीषण धडकेत प्रवासी ऑटो आणि कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऑटोमधील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या नागरिकांनी आणि पोलिसांनी जखमींना ॲम्ब्युलन्सद्वारे परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
तसेच स्विफ्ट कार, प्रवासी ऑटो आणि मालवाहू ऑटोमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर बोरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे बीट जमादार दिलावर खान पठाण यांनी अपघातस्थळाला भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास स्थानिक पोलिसांकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis