
परभणी, 31 ऑक्टोबर (हिं.स.)। “शहरातील आणि जिल्ह्यातील नुकसानग्रस्त नागरिकांना शासकीय मदत मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” असा ठाम निर्धार परभणी महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते सुशील कांबळे मानखेडकर यांनी व्यक्त केला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अनुसया टॉकीज ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान ‘धडक मोर्चा’ काढण्यात येणार असल्याची माहिती दिली.
गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर आणि जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. काहींची घरे कोसळली, तर काहींची उभी पिके नष्ट झाली. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले, लेकीसाठी जमवलेले दागिने, लेकरांची पुस्तके, कपडे, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. दिवाळीतही अनेक कुटुंबांच्या घरात आनंदाऐवजी अश्रूंचा महापूर दिसला.
या कठीण परिस्थितीत भीम नगर, क्रांतीनगर, इंदिरा गांधी नगर, ताडेश्वर नगर, माऊली नगर, साकला प्लॉट, उदयनगर, आनंद नगर, मंत्री नगर आणि विकास नगर या भागातील नागरिक प्रशासनाच्या दारात न्याय मागत आहेत. परंतु, त्यांच्या अर्ज, निवेदने, नुकसानीचे फोटो आणि पुरावे हे सगळे जिल्हा प्रशासनाच्या फाईलमध्ये अडकलेले आहेत, असा आरोप कांबळे यांनी केला.
“सरकारी फाईलमधील प्रत्येक पानामागे एक उद्ध्वस्त आयुष्य आहे, पण प्रशासनाला त्याची जाणीव नाही. या प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध आणि जनतेच्या आत्मसन्मानाच्या लढ्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही, तर नुकसानग्रस्तांच्या वेदनांचा आणि अन्यायाविरुद्धच्या आवाजाचा आहे,” असे कांबळे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis