नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सरन्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठात एका वकिलाने गोंधळ घातला. या वकिलाने सरन्यायाधीशांवर कथितपणे जोडा फेकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या वकिलाला ताब्यात घेतले आहे.
या गोंधळादरम्यान सरन्यायाधीश गवई पूर्णपणे शांत राहिले आणि त्यांनी खटल्याची सुनावणी सुरूच ठेवली. पोलिस जेव्हा त्या वकिलाला कोर्टरूममधून बाहेर नेत होते, तेव्हा तो “सनातनचा अपमान सहन करणार नाही” अशा घोषणा देत होता.
प्राप्त माहितीनुसार, एक वकील डायसजवळ पोहोचला आणि त्याने कथितपणे आपला जोडा काढून न्यायाधीशांकडे फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टात उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांनी तत्परतेने त्याला पकडले आणि बाहेर नेले. वकील बाहेर जाताना “सनातनचा अपमान सहन करणार नाही” असे ओरडत होता. या प्रकारानंतर आरोपी वकील राकेश किशोर याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे नाव राकेश किशोर असल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालय बारमध्ये त्याची नोंदणी 2011 साली झाली होती.
सरन्यायाधीशांवर कथितपणे जोडा फेकण्याचा प्रकार गंभीर असल्याने या घटनेने मोठे वळण घेतले आहे. सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तातडीची बैठक घेतली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा झाली आणि पुढील कारवाईबाबत रणनीती ठरवण्यात आली. आरोपी वकील राकेश किशोर याच्यावर कोणती कारवाई करावी, यावर या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी