— महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायदा २०१५ अंतर्गत ७० सेवा उपलब्ध अमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.) अमरावती महानगरपालिका नागरिकांच्या दारी सेवा पोहोचविण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे. नागरिकांना पारदर्शक, तत्पर आणि सुलभ सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सेवा हक्क कायदा २०१५ अंतर्गत महानगरपालिकेकडून एकूण ७० ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी कार्यालयात चकरा न मारता घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येतो. महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरrts.amravaticorporation.inवरून या सेवा सुलभपणे मिळू शकतात. महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ई-गव्हर्नन्स प्रणालीला प्रोत्साहन देत नागरी प्रशासन अधिक डिजिटल, पारदर्शक आणि जबाबदार बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या ऑनलाईन सेवांचा संचालन सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे आणि संगणक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. उपलब्ध सेवा क्षेत्रे: या ७० ऑनलाईन सेवांमध्ये नागरिकांना दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक सुविधा समाविष्ट आहेत, महानगरपालिका प्रशासनाने या सेवांसाठी निश्चित कालमर्यादा देखील ठरवली असून नागरिकांना वेळेवर सेवा मिळावी यासाठी संबंधित विभागांना जबाबदारी देण्यात आली आहे. नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा विलंब झाल्यास सेवा हक्क कायदा २०१५ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. या उपक्रमामुळे नागरिकांना पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाचा अनुभव मिळत असून शहरातील सर्व विभागांमध्ये “डिजिटल अमरावती” या संकल्पनेला नवे बळ मिळत आहे. महानगरपालिका आयुक्त सौ. सौम्या शर्मा चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सर्व नागरी सेवा ऑनलाईन माध्यमातूनच घेऊन वेळ, पैसा आणि ऊर्जा वाचवावी तसेच मनपा प्रशासनाला सहकार्य करावे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी