अकोला, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। “ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये”, “जातीय जनगणना झाली पाहिजे”, आणि “आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही” अशी वेदनादायक हाक देत आलेगाव (ता. पातूर, जि. अकोला) येथील शेतकरी विजय बोचरे (वय ५९) यांनी ९ ऑक्टोबरच्या पहाटे आलेगाव बसस्थानकावरील प्रवासी निवाऱ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली.
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे बोचरे यांचे हे पाऊल संपूर्ण परिसराला हादरवून गेले आहे.
आत्महत्येपूर्वी विजय बोचरे यांनी आपल्या मोबाईलवर सलग तीन भावनिक स्टेटस पोस्ट केले होते. त्यांनी मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांना उद्देशून लिहिले होते की,
“राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. आमच्या मुला–बाळांचं भविष्य धोक्यात आलं आहे. शिक्षणात, नोकरीत आणि राजकारणात आमचं स्थान हरवत चाललं आहे. आमचं जीवन जगण्याचा अर्थ नाही. जय ओबीसी, जय संविधान.” तसेच त्यांनी पुढे स्पष्ट आवाहन केलं होतं की, “जातीय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये.” हे संदेश त्यांनी पहाटे साडेदोनच्या सुमारास स्टेटसला ठेवले, आणि त्यानंतर काही वेळातच गळफास घेतला.
चान्नी पोलिस तत्काळ घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन चान्नी येथील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला.
या प्रकरणी चान्नी पोलीस तपास करीत आहेत.
ओबीसी समाजात संताप आणि हळहळ
विजय बोचरे यांच्या आत्महत्येने आलेगावसह पातूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील नागरिकांनी सांगितले की, “बोचरे हे मेहनती शेतकरी, तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी नेहमी सक्रिय असणारे कार्यकर्ते होते. त्यांचे समाजप्रेम आणि न्यायासाठीचे भान सर्वांना प्रेरणादायी होते. त्यांच्या आत्महत्येने आलेगाव हादरले आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे