लातूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायदान कक्षेमध्ये झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध म्हणून, लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला.
सदर मोर्चा लातूर न्यायालय परिसरातून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समाप्त झाला. या मोर्चामध्ये सर्व वकील बांधवांनी एकजुटीने सहभाग नोंदविला. लाल फिती लावून वकील बांधवांनी शांततेत आपला निषेध नोंदविला. या मोर्चाच्या माध्यमातून, सर्वोच्च न्यायालयासारख्या पवित्र न्यायसंस्थेतील अशा प्रकारच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा व सुरक्षितता अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली.
मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध रीतीने पार पडला. विशेष सर्वसाधारण सभेत या घटनेचा निषेध करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता, दिवसभर वकील बांधवांनी लाल फित लावून कामकाज केले. या मोर्चामध्ये लातूर जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ऍड. योगेश जगताप, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. आण्णाराव पाटील, लातूर जिल्हा वकील मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. संजय जगदाळे, महिला उपाध्यक्ष ऍड. मनीषा दिवे पाटील, सचिव ऍड. गणेश गोजमगुंडे, ग्रंथालय सचिव ऍड. प्रणव रायपूरकर तसेच व लातूर जिल्हा वकील मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis