चंद्रपूर मनपाचे एक कोटीच्या जवळपास नुकसान, कंत्राटदाराला आर्थिक लाभ
चंद्रपूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। बागला चौक ते राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज पर्यंत जीवघेणे खड्डे असलेला रस्ता सोडून साडेतीन कोटी रुपयांच्या रस्ता दुभाजकाचे काम करण्याचा प्रस्ताव चंद्रपूर महानगरपालिकेने केला. हा सर्व अट्टाहास मेसर्स सूर्यवंशी एंटरप्रा
चंद्रपूर मनपाचे एक कोटीच्या जवळपास नुकसान, कंत्राटदाराला आर्थिक लाभ


चंद्रपूर, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।

बागला चौक ते राजीव गांधी इंजीनियरिंग कॉलेज पर्यंत जीवघेणे खड्डे असलेला रस्ता सोडून साडेतीन कोटी रुपयांच्या रस्ता दुभाजकाचे काम करण्याचा प्रस्ताव चंद्रपूर महानगरपालिकेने केला. हा सर्व अट्टाहास मेसर्स सूर्यवंशी एंटरप्राइजेस साठी करण्यात आल्याचा तसेच ह्या कारणामुळे मनपाला एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या कामांमध्ये तत्कालीन आयुक्त पालीवाल यांना कमिशन म्हणून 50 लक्ष रुपयाचे टोकन मिळाले असाही आरोप देशमुख यांनी केला.

टोकाच्या स्पर्धेमुळे मनपात काम करणारे कंत्राटदार अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा 25 ते 30 टक्के कमी दराने काम घेतात. इरई नदीच्या बाजूला तयार करण्यात आलेले विसर्जन कुंड,या ठिकाणी नूकताच नुकताच तयार करण्यात आलेला सिमेंट काँक्रीट प्लॅटफॉर्म, शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीचे काम या कामांच्या अंदाजपत्रकीय किंमती अनुक्रमे 5 कोटी,1.5 कोटी व 1 कोटी रूपये आहे. ही कामे कंत्राटदारांनी अंदाजपत्रकीय किंमतीपेक्षा अनुक्रमे 22% कमी म्हणजे 3 कोटी 90 लक्ष रुपये,34% कमी म्हणजे जवळपास 1 कोटी रूपये व 25 % कमी म्हणजे 75 लक्ष रुपयांमध्ये घेतले.

इतकी गळेकापू स्पर्धा असताना 3.5 कोटी रुपयांचे रस्ता दुभाजकाचे काम मेसर्स सूर्यवंशी इंटरप्राईजेसला अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा फक्त 0.01 टक्के कमी दराने म्हणजेच अंदाजपत्रकीय किमतीमध्ये कसे मिळाले ? हा प्रश्न आहे. कोणतेही ठोस कारण न देता या निविदा प्रक्रियेत पाच पैकी तीन एजन्सीला अपात्र करण्यात आले. मर्जीतल्या कंत्राटदारासाठी स्पर्धा संकुचित केल्याने मनपाचे जवळपास एक कोटी रुपयांचे नुकसान झाले व कंत्राटदाराला तेवढाच आर्थिक लाभ झाला. रस्ता दुभाजकाचे काम रद्द करण्यात यावे व विपिन पालीवाल यांची एसआयटी मार्फत चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी लवकरच जनविकास सेनेतर्फे मोठे जन आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती देशमुख यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande