अमरावती, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बांधवांचा टप्पा वाढ निधी तातडीने वितरित करण्यात यावा, या मागणीसाठी माजी आमदार सुधाकर कोहळे आणि भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सह संयोजक तसेच शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री .ना. अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत सुधाकर कोहळे आणि चंद्रशेखर भोयर यांनी दिवाळीपूर्वीच निधी वितरित करण्याची मागणी केली. त्यांनी नमूद केले की, राज्य शासनाने दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना टप्पा वाढ निधी देण्यास मान्यता दिली आहे; मात्र अद्याप निधी वितरित झालेला नाही. दिवाळीपूर्वी निधी मिळाल्यास शिक्षकांना आर्थिक दिलासा मिळून सण आनंदात साजरा करता येईल. सर्वांची दिवाळी गोड करणार : अजित पवार या मागणीवर तत्काळ प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता यांच्याशी थेट संपर्क साधून निधी संदर्भातील फाईल तातडीने पुढे पाठविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच, “दिवाळीपूर्वीच हा निधी वितरित झाला पाहिजे,” असे आदेशही त्यांनी दिले. या भेटीमुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, निधी वितरणाची प्रक्रिया आता गती घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी