बीड, 9 ऑक्टोबर (हिं.स.)।
तालुक्यातील मौजे कपिलधारवाडी गावावर भूगर्भीय हालचालींचे संकट ओढवले असून, गावातील रस्ते, घरांच्या भिंतींना मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. अनेक घरांना या भेगांमुळे तडे जाऊन वास्तव्य करणे धोकादायक ठरले. दरम्यान ही स्थिती लक्षात घेऊन कपिलधारवाडीचे तात्काळ पुनर्वसन आवश्यक असल्याने माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी म्हटले आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत भूगर्भशास्त्रज्ञांसह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. संपूर्ण गाव भयग्रस्त वातावरणात जगत आहे. महिलांसह लहान मुलांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी गावाचे पुनर्वसन अपरिहार्य असल्याचे प्रा. सुरेश नवले यांनी स्पष्ट केले आहे.
गाव पुनर्वसनासाठी पाली ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक ६११ मधील ६८ एकर गायरान जमीन उपयुक्त ठरू शकते, असा प्रस्ताव ग्रामस्थांनी एकमुखाने मांडला आहे. ही जागा भूगोलाच्या दृष्टीने सुरक्षित असून, येथील शेती आणि नव्या वस्तीचा समन्वयही सहज शक्य आहे. त्यामुळे या ठिकाणी कपिलधारवाडीचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
प्रा. नवले यांनी शासन आणि प्रशासनाकडे सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे की, गट क्रमांक ६११ मधील गायरान जागेवर कपिलधारवाडीचे पुनर्वसन हा कायमस्वरूपी आणि तर्कसंगत तोडगा ठरू शकेल. प्रशासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तातडीने प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या गावातील नागरिक अत्यंत भीतीच्या छायेत दिवस काढत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे. अशा वेळी कपिलधारवाडीचे तात्काळ पुनर्वसन करणे ही मानवी आणि प्रशासकीय दोन्ही दृष्ट्या तातडीची गरज असल्याचे मत प्रा.नवले यांनी व्यक्त केले आहे.यावेळी शिवाजीराव नवले श्रीमंतरावजी उबाळे केशव शिंदे रुद्राक्ष माकले सुदर्शन शिंदे बंडू भोसले संजय सल्लागार योगेश सव्वाशे नवनाथ शिंदे लक्ष्मण जाधव नानाभाऊ शिंदे बप्पा शिंदे दुर्गाबाई शिंदे अहिल्याबाई शिंदे या बाई शिंदे साहेबराव शिंदे आशाबाई माखले आदी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis