सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। राज्यातील २९ जिल्ह्यांमधील तब्बल ४७ लाख हेक्टरवरील पिके वाया गेल्याचा नजर अंदाज अहवाल कृषी विभागाने शासनाला दिला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरपाई मिळेल म्हणून युद्धपातळीवर पंचनामे सुरू आहेत. मात्र, मंगळवारी राज्य सरकारने मदतीसाठी बाधित क्षेत्राची मर्यादा दोनऐवजी तीन हेक्टरपर्यंत केल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी संभ्रमात सापडले असून हेक्टरची मर्यादा वाढविल्यास पुन्हा पंचनामे करावे लागतील म्हणून सध्या पंचनामे थांबविण्यात आले आहेत.
सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बीड, धाराशीव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. याशिवाय हिंगोली, वर्धा, नागपूर, अमरावती, बुलडाणा, अकोला अशा २९ जिल्ह्यांनाही मोठा फटका बसला आहे. राज्यातील ७१ लाख शेतकऱ्यांचे या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे.दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर केले. पंचनामे किती हेक्टरच्या मर्यादेत करायचे, पूर्वीच्या की नव्या शासन निर्णयानुसार पंचनामे करायचे, सरसकट भरपाई मिळणार म्हणजे नेमके काय, या प्रश्नांची उत्तरे त्या शासन निर्णयातून मिळतील असा विश्वास अधिकाऱ्यांना होता. मात्र, शासन निर्णय न निघाल्याने अधिकारीच संभ्रमात सापडले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड