* मंत्रालयात येत्या आठवड्यात बैठक
मुंबई, 9 ऑक्टोबर (हिं.स.) - माहिम येथील ऐतिहासिक किल्ला आणि सभोवतालचा तीन एकरचा परिसर विकसित करण्यात येणार असून याबाबत मंत्रालयात येत्या आठवड्यात बैठक ही घेण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे दिली.
आज मंत्री आशिष शेलार यांनी मुंबईतील अतिशय महत्त्वाच्या अशा माहिम किल्ला परिसराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पुरातत्व विभागाचे अधिकारी, पीडब्ल्यूडी विभागाचे अधिकारी, मुंबई महानगरपालिका हेरिटेज विभागातील कन्सल्टंट, त्यातले अधिकारी, मुंबई पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
माहिमचा किल्ला ही मुंबईतील अतिशय पुराण वास्तू असून तेराव्या शतकामध्ये राजा बिंबाराजाने बांधलेलं मूळचं हे स्ट्रक्चर, हा किल्ला आहे. चौदाव्या शतकामध्ये गुजरातच्या सुलतानाने त्यावर हल्ला केला. आणि मग सोळाव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी या ठिकाणी हा किल्ला उभा केला, तो आजचा हा माहिमचा किल्ला म्हणून ओळखला जातो. इथून जवळच बांद्राचा किल्ला आहे आणि वरळीचा किल्ला सुद्धा बाजूलाच आहे.
या वास्तूमध्ये वर्षानुवर्ष खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत होतं. मुंबई महापालिकेने या ऐतिहासिक वास्तूला अतिक्रमणापासून मुक्त करण्याचं काम केले. त्यामुळे माहिमचा किल्ला आज मोकळा श्वास घेतो आहे. आता यापुढे किल्ल्याचे जतन, संवर्धन, सुशोभिकरण करण्यात येणार असून मुंबई महापालिका आणि त्यांचे कन्सल्टंट, पुरातत्व खात्या तर्फे हे काम करण्यात येणार आहे.
जवळजवळ एक एकर मध्ये असलेला हा पूर्ण किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेली दोन एकरची मोकळी आणि अन्य जागा, असा तीन एकर समुद्रकिनारा असलेला हा परिसर आहे.
ज्याला पोर्तुगीजांनी त्या वेळेला बांधलेलं आणि मूळ स्ट्रक्चरमध्ये सापडलेले अवशेष जे राजा बिंबाच्या काळापासूनचे आहेत ते सुद्धा याच भागामध्ये अजूनही अस्तित्वात आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विकासाचा कार्यक्रम, धोरण आणि योजना मुंबई महानगरपालिकेच्या नेतृत्वामध्ये संपूर्णता करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असेही आशिष शेलार यांनी जाहीर केले.
या विषयामधली एक बैठक मंत्रालयामध्ये येत्या आठवड्यातच घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबईकरांना विकासाच्या प्रगतीबरोबर आपली विरासत असलेल्या गोष्टींची सुद्धा इत्थंभूत माहिती, व सुविधा देणे हेच धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे आहे. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं त्याला सहकार्य आहे. मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्याबद्दल सहकार्य करायचं ठरवलंय. पुरातत्व विभाग त्याबरोबर काम करणार आहे, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी