पुणे, 9 ऑक्टोबर,(हिं.स.)। पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव आणि हवेली या तीन पंचायत समित्यांचे सभापतीपद हे खुले सर्वसाधारण गट झाले असून इंदापूरचे सभापतीपद अनुसुचित जाती एस.सी. तर, जुन्नर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जमाती एस.टी. प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील १३ पैकी ७ सभापती पदे ही विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहेत. यापैकी एक पद अनुसुचित जमाती प्रवर्गातील महिलेसाठी, दोन पदे ही नागरिकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी ) महिलांसाठी आणि चार पदे ही खुल्या गटातील (सर्वसाधारण) महिलांसाठी राखीव झाली आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत गुरुवारी पुणे दि तेरा पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या समन्वयक व उपजिल्हाधिकारी डॉ. चारूशीला मोहिते -देशमुख, पुणे जिल्हा निवडणूक शाखेचे तहसीलदार राहूल सारंग, कुळ कायदा शाखेचे तहसीलदार जगदीश निंबाळकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु