रत्नागिरी, 9 ऑक्टोबर, (हिं. स.) : काही दिवसांपूर्वी महामार्गावर वृद्ध महिलेला मारहाण करून झालेल्या लुटीच्या वेळी राजापूरमधील रिक्षाचालक इब्राहीम खलिफे यांनी माणुसकी जोपासत महिलेला वेळीच ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. ही तत्परता व माणुसकीची भावना लक्षात घेऊन राजापूर पोलिसांनी इब्राहीम खलिफे यांचा शाल देऊन त्यांचा सन्मान केला.
गेल्या २ ऑक्टोबरला सायंकाळी सहाच्या दरम्यान मुंबईगोवा महामार्गावरील गंगातीर्थ होम स्टेच्या पुढील वळणावर सौ रश्मी प्रभाकर चव्हाण (वय 65 वर्षे, तरळवाडी, कोदवली, ता. राजापूर) या वयोवृद्ध महिलेला एक अज्ञात कारचालकाने मारहाण करत दुखापत करून घटनास्थळावरून पळून गेला. त्याच वेळी राजापूरमधील रिक्षाचालक इब्राहिम खलिफे रिक्षातील भाडे सोडुन राजापूरमध्ये परतत असताना रस्त्यावरील प्रसंग पाहून त्या महिलेला आपल्या रिक्षात बसवून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. खलिफे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व कार्यतत्परतेबद्दल राजापूर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे यांनी पोलीस ठाण्यात इब्राहिम खलिफे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
मुंबई-गोवा महामार्गावर अपघात अथवा अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी पुढाकार घेऊन मदत करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी