पुणे, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। पुणे जिल्हा परिषदेने जीविका फाऊंडेशनसोबत 'सर्व्हायकल फ्री पुणे या सर्वसमावेशक आरोग्य उपक्रमासाठी सामंजस्य करार केला आहे. हा करार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील व जीविका फाऊंडेशनचे संचालक जिगनेश पटेल यांच्या हस्ते स्वाक्षरीत करण्यात आला.
या कराराअंतर्गत ९ ते १४ वयोगटातील सर्व मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधासाठी एचपीव्ही लस १०० टक्के प्रमाणात दिली जाणार आहे. तसेच सर्व अविवाहित महिलांची तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यासाठी तपासणी करण्यात येणार आहे, ज्यामधून लवकर निदान व उपचार करता येणार आहे.
श्री. पाटील म्हणाले, हा उपक्रम ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्यासाठी तसेच कर्करोग प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा उपक्रम शासनाच्या प्रतिबंधात्मक आरोग्य आणि जनजागृतीच्या उद्दिष्टांना पूरक आहे.
श्री. पटेल म्हणाले, 'जीविका फाऊंडेशन' पुणे जिल्हा परिषदेसोबत मिळून 'सर्व्हायकल फ्री पुणे या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी शाश्वत व समुदायाधारित आरोग्य उपक्रम राबविण्यास कटिबद्ध आहे.
या उपक्रमाचा किशोरवयीन मुली व महिलांना होणार असून पुणे जिल्हा कर्करोगमुक्त व आरोग्यदायी भविष्याच्या दिशेने वाटचाल करेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु