लातूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। लातूर तालुक्यातील दोन शिक्षकांना निलंबीत करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गैरवर्तन करणा-या शिक्षकावर कारवाईचा बडगा उगारल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
लातूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, शिराळा येथे मुख्याध्यापक म्हणून परमेश्वर हिराचंद माळी हे अनेक दिवसापासून शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या शाळेतील सहकारी शिक्षकाबरोबर अरेराविची भाषा करणे अशा बारीक सारीक घटनेवारून दि. २८ ऑगस्ट रोजी शाळेत दुपारी ३.४५ ते ४.३० च्या दरम्यान हाणामारी झाली. यात सहकारी शिक्षकास गाल, नाक, गळयावर जबर मारहाण केल्याने पोलिस ठाण्यात गुन्हयाची नोंदही झाली. या संदर्भाने लातूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाचे विस्तार अधिकारी यांच्या मार्फत चौकशी करून सदर अहवाल गट शिक्षणाधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सादर केला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने परमेश्वर माळी यांना निलंबीत केले आहे.
लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल कुमार मिना हे दि. १२ सप्टेंबर रोजी जिल्हा दौ-यावर असताना त्यांनी लातूर तालुक्यातील चांडेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता या शाळेतील शिक्षक केशव शामराव गंभीरे हे गैरहजर असल्याचे दिसून आले होते. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी राहूल कुमार मिना हे दि. ७ ऑक्टोबर रोजी जिल्हा दौ-यावर असताना पुन्हा एकदा चांडेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता या शाळेतील शिक्षक केशव शामराव गंभीरे हे गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केशव गंभीरे यांना निलंबीत करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis