सोलापूर, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। यंदाच्या पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी व पावसाने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यावरील 230 ठिकाणी असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूचे अप्रोचचा भराव वाहून गेला आहे. यात बांधकाम विभागाचे 151 कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार यांनी दिली.
यावर्षीचा पावसाळा हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. सतत मुसळधार पाऊस होत राहिला. या पावसाने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध तालुक्यासह गावांना जोडणार्या रस्त्यांचे मोेठे नुकसान झाले आहे. तब्बल 230 ठिकाणी असलेल्या पुलांच्या दोन्ही बाजूला असलेल्या अप्रोचचा भराव पुरात वाहून गेला आहे. भराव वाहून गेल्याने वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला होता. अशा ठिकाणचे रस्ते बांधकाम विभागाच्या जिल्हा प्रशासन स्तरावरून नागरिकांच्या सोयीसाठी प्रयत्न करून तात्पुरती वाहतूक सुरू केली आहे. पुलाच्या अप्रोचचा भरावासह लहान पुलाचे पाईपही वाहून गेले आहेत. याची पाहणी झाल्याची माहिती कुंभार यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड