पुणे, 9 ऑक्टोबर, (हिं.स.)। पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार सन २०२५ करिता केळी, मोसंबी, पपई, संत्रा, आंबा, द्राक्ष व डाळिंब या पिकांसाठी सहभागी होण्यासाठी https://www.pmfby.gov.in या राष्ट्रीय फळ पीक विमा पोर्टलवर विहित मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
ही योजना पुणे जिल्ह्यात बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, पुणे मार्फत राबविण्यात येत आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी द्राक्ष पिकासाठी १५ ऑक्टोबर, केळी, मोसंबी, पपईसाठी ३१ ऑक्टोबर, संत्रा पिकासाठी ३० नोव्हेंबर, आंबा पिकासाठी ३१ डिसेंबर 2025 व डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२६ याप्रमाणे अंतिम मुदत राहील. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणार आहेत किंवा नाही याबाबत घोषणापत्र भरुन देणे आवश्यक राहील.
योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी अधिसूचित फळबागांचे प्रती शेतकरी कमीत कमी २० गुंठे व जास्तीत जास्त ४ हेक्टर इतके उत्पादनक्षम क्षेत्र असणे आवश्यक आहे. केवळ उत्पा दनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी, आधार कार्ड, बँक खाते तपशील, जमीन धारणा उतारा, फळबागेचा जिओ टँगिंग फोटो, भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत भाडेकरार, ई-पीक पाहणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही कळविण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु