पुणे, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। वडगाव शेरी आणि कल्याणीनगर परिसरात अनधिकृत सुरू असलेल्या रेस्टॉरंट, पबमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. साइड मार्जिन, फ्रंट मार्जिनमध्ये, तसेच इमारतीच्या गच्चीवर असे व्यवसाय सुरू करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. मिळकतकर विभागाने परवानगीशिवाय सुरू केलेल्या १५१ व्यावसायिकांना नोटीस बजावली आहे. त्यांच्याकडून अतिरिक्त २२.७६ लाख रुपयांचा कर वसूल केला जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त अविनाश सपकाळ यांनी सप्टेंबर महिन्यात नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रत्यक्ष जागा पाहणी करून मिळकतींची तपासणी केली. त्यात नोटीस बजावलेल्या १५१ मिळकतधारकांची तपासणी केली. त्यातील ४७ मिळकतींची कर आकारणी भोगवटा पत्र आणि मान्य नकाशाप्रमाणे योग्य असल्याचे आढळले. या मिळकतीच्या वापरात किंवा बांधकामात कोणतेही बदल आढळून आले नाहीत. मात्र, ४४ मिळकतीमध्ये साइड मार्जिनचे उल्लंघन, वाढीव बांधकाम किंवा अनधिकृत व्यावसायिक वापर आढळून आला. या मिळकतींसाठी ‘अ-फॉर्म’ तयार केला असून, आकारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या प्रक्रियेतून महापालिकेला सुमारे २२.७६ लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे, असे पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु