पुणे, 9 ऑक्टोबर (हिं.स.)। खोकल्याची औषधे तयार करणाऱ्या दोन कंपन्यांच्या कफ सिरपमध्ये ‘डायथिलीन ग्लायकॉल’ हे रसायन प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याचे तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए, औषध विभाग) त्यापैकी ‘रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या ‘रेसिफ्रेश टी आर’ या कफ सिरपचा १३ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. त्याची विक्री व वितरण थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचबरोबर ‘शेप फार्मा प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे ‘रिलाइफ’ या कफ सिरपमध्येदेखील प्रमाणापेक्षा जास्त ‘डायथिलीन ग्लायकॉल’ रसायन आढळल्याने त्याचाही साठा प्रतिबंधित केला आहे. तसेच, वितरण थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही कंपन्या गुजरात येथील आहेत. मात्र, याचे साठे कोठे जप्त केले याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, हा साठा पुण्यात जप्त केल्याचे सांगितले जात आहे.ही कारवाई सार्वजनिक हितासाठी करण्यात आली आहे, असे महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासनाचे औषध नियंत्रक डी.आर. गहाणे यांनी कळविले आहे.
पुणे विभागाचे ‘एफडीए’चे सह आयुक्त गिरीश हुकरे (औषध विभाग) यांनी दोन कंपन्यांचे कफ सिरप वितरणासाठी प्रतिबंधित केल्याचे स्पष्ट केले. पुण्यातून नऊ कफ सिरपचे नमुने तपासणीला घेतले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु