
* प्रत्यक्ष प्रारंभ निविदा प्रक्रियेनंतरच
अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने विकासकामांना गती दिली आहे. आचारसंहितेपूर्वीच कामे मार्गी लावण्यासाठी तब्बल ३४ कोटी ५३ लाख रुपये खर्चाच्या १४४ विकासकामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष कामांना सुरुवात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश मिळाल्यानंतरच होणार आहे.
नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायती व महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास अडीच ते तीन महिने विकासकामे ठप्प राहण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम म्हणून फेब्रुवारी-मार्च या दोनच महिन्यांत निधी खर्चासाठी वेळ उपलब्ध राहणार आहे, त्यामुळे निधी अखर्चित राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने ग्रामिण मार्ग, इतर जिल्हा मार्ग व तीर्थक्षेत्र या शिर्षांतर्गत एकूण ४४ कोटी २२ लाख रुपयांचे नियोजन केले आहे. यामधून
ग्रामिण रस्ते: २१ कोटी १९ लाख रुपये (६४ कामे)इतर जिल्हा मार्ग: ५ कोटी ३५ लाख रुपये (१४ कामे)तीर्थक्षेत्र: ७ कोटी ९९ लाख रुपये (६६ कामे)अशी ३४ कोटी ५३ लाख रुपयांची कामे प्रशासकीयदृष्ट्या मंजूर करून नियोजन विभागाकडे निधीकरिता पाठविण्यात आली आहेत. निधी प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी