
परभणी, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : जिंतूर–जालना महामार्गावरील नागानगर पाटी येथे अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका हरणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर–जालना महामार्गावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने हरणाला जोरदार धडक दिली. या धडकेत हरणाचे दोन्ही पाय तुटले आणि ते गंभीर अवस्थेत रस्त्याच्या खाली कोसळले. काही क्षणातच तडफडून त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेत काही भटक्या कुत्र्यांनी मृत हरणाचे लचके तोडल्याचेही समजते.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर काळवीट, हरणे आणि निलगाय यांसारख्या वन्य प्राण्यांची वर्दळ वाढली असून, अन्न व पाण्याच्या शोधात हे प्राणी रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकांमुळे आपले प्राण गमावत आहेत. या गंभीर प्रकाराकडे वनविभागाचे मात्र दुर्लक्ष झाल्याची स्थानिकांकडून टीका व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis