जालना-आपदा मित्र प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
जालना, 1 नोव्हेंबर (हिं.स.) आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपदा मित्र (आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारा स्वयंसेवक) म्हणून स्वेच्छेने प्रशिक्षण घेण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना अथवा आपल्या नजीकच्या तह
जालना-आपदा मित्र प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन


जालना, 1 नोव्हेंबर (हिं.स.) आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपदा मित्र (आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारा स्वयंसेवक) म्हणून स्वेच्छेने प्रशिक्षण घेण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना अथवा आपल्या नजीकच्या तहसील कार्यालय येथे नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील 20 जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या आपदा मित्र या योजनेचे यश विचारात घेऊन उर्वरित 16 जिल्ह्यात 'आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम' राबविण्यास शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यामधून एकूण 300 आपदा मित्रांना (स्वंयसेवक) आपत्ती व्यवस्थापन विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आपदा मित्रांत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी/विद्यार्थीनी, एनसीसी/एनएसएस विद्यार्थी, अशासकीय संस्था, आशा, पोलिस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीना 12 दिवसाचे निवासी प्रशिक्षण, वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच, 3 वर्षासाठी 5 लाखाचे विमा संरक्षण राज्य शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील कीट आपदा मित्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.

आपदा मित्र निवडीसाठी सदर व्यक्ती ही भारताची नागरिक असावी व संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावी. सदर व्यक्ती हि शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावी. वय-18 ते 45 वर्ष (माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंता, शास्त्रज्ञ, आपत्कालीन सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल त्याकरिता वयोमर्यादा 55 वर्षे असेल मात्र त्यांना विमा सुरक्षा देता येणार नाही.) आपदा मित्र प्रशिक्षणामध्ये किमान 35 टक्के महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे. याप्रमाणे निकष ठरविण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande