
* यापूर्वीची नजरअंदाज पैसेवारी 60
अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)
शेती पिकांची वास्तविकता स्पष्ट करणारी सुधारित पैसेवारी शुक्रवारी घोषित करण्यात आली. ही पैसेवारी ४९ वर स्थिरावली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ही घोषणा केली. त्यानुसार दुष्काळी उपाययोजनांसाठी प्रशासनात लगबग सुरू झाली आहे. यापूर्वीची नजर अंदाज पैसेवारी ही ५० हून अधिक (६०) होती.
राज्य शासनाने एक दिवसापूर्वीच शेतीपिकाचे नुकसान झाले, हे मान्य केले असून जिल्हाभरातील जवळपास सर्व शेतकऱ्यांना सततच्या पावसामुळे नुकसान झाल्यावर द्यावयाचे अनुदान घोषित केले आहे. त्यानंतर आज सुधारित पैसेवारी ५० च्या आत आल्याने दुष्काळी उपाययोजनाही लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या घोषणेनुसार सर्वाधिक ५३ ही पैसेवारी अमरावती तालुक्याची असून मोर्शी व वरुड तालुक्याची अनुक्रमे ५२ व ५१ आहे. तर सर्वात कमी ४३ एवढी पैसेवारी ही तिवसा तालुक्याची आहे. पैसेवारीचे आकडे ५० च्या आत असल्यास महसूल व कृषी खात्याला दुष्काळी योजना लागू कराव्या लागतात. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर नियोजन केले जात आहे. पैसेवारीची आकडेमोड करण्यासाठी महसूल प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण १९७३ गावांमध्ये शेती पिकाची पाहणी केली. जिल्ह्यात एकूण २००४ गावे असून यापैकी ३१ गावे उजाड असल्याचा महसूल खात्याचा अहवाल आहे. पाहणी केलेल्या १९७३ गावांपैकी १६४२ गावांमध्ये ५० पेक्षा कमी पैसेवारीची नोंद करण्यात आली आहे. तर ३३१ गावांची पैसेवारी ही ५० पेक्षा जास्त असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. तालुका पैसेवारी अमरावती 53 भातकुली 48 तिवसा 43 चांदूर रेल्वे 47 धामणगाव रेल्वे 49 नांदगाव खंडेश्वर 49 मोर्शी 52 वरुड 51 अचलपूर 46 चांदूर बाजार 47 दर्यापूर 48 अंजनगाव सुर्जी 48 धारणी 49 चिखलदरा 48 एकूण 49
या असतील उपाययोजना पैसेवारी ५० च्या आत असल्यामुळे काही उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये कर्ज आणि वीज बिल वसुलीला स्थगिती, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काला माफीचा समावेश आहे. याशिवाय नुकसानाच्या अनुदानातून कोणत्याही प्रकारची कर्ज कपात न करता ती रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या मर्जीनुसार वापरण्याची मुभा द्यावी लागते.
पैसेवारीत तिवसा सर्वात कमी, अमरावती तालुका सर्वाधिक तालुकानिहाय पैसेवारीच्या आकड्यांमध्ये तिवसा तालुक्याची पैसेवारी ही सर्वात कमी ४३ वर थांबली आहे. याउलट जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावती तालुक्याची पैसेवारी ही ५३ नोंदण्यात आली आहे. दरम्यान ५० च्या वर पैसेवारी असलेल्या आणखी दोन तालुक्यांमध्ये मोर्शी (५२) व वरुड (५१) चा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी