राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ (धुळे-सोलापूर) उड्डाणपुलाचे काम त्वरित करण्याचे निर्देश
बीड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।गेवराई विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ (धुळे-सोलापूर) च्या संबंधित समस्यांसंदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री.अमरीश मानकर यांची छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात भ
राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ (धुळे-सोलापूर)


बीड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।गेवराई विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ (धुळे-सोलापूर) च्या संबंधित समस्यांसंदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री.अमरीश मानकर यांची छत्रपती संभाजीनगर येथील कार्यालयात भेट घेऊन तपशिलाने चर्चा केली. अशी माहिती गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली आहे

या संदर्भात माहिती देताना आमदार पंडित म्हणाले की, गेवराई शहराच्या दोन्ही प्रवेशिकेजवळ मंजुर असलेले उड्डाण पुल निर्मितीचे काम संथ गतीने होत असल्यामुळे त्याला विलंब होत आहे. याप्रकरणी चर्चा होऊन प्रकल्प संचालक यांनी मे.अग्रवाल ग्लोबल इन्फ्राटेक प्रा.लि. या कंत्राटदार कंपनीला कामाची गती वाढविणे संदर्भात सूचना दिल्या.

महामार्गावरील मौजे रांजणी आणि पेंडगाव येथे प्राणांकित अपघताची संख्या लक्षात घेऊन उड्डाण पुल निर्मितीची मागणी केली. याप्रकरणी कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागाराची नियुक्ती झाली असून सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर काम सुरु करण्यात येईल असे आश्वासन प्रकल्प संचालक यांनी दिले.

बीड शहराच्या प्रवेशिकेजवळ महालक्ष्मी चौकाजवळ मौजे शिदोड, लोळदगाव, कुर्ला या रस्त्याला सर्व्हिस रोड तयार करण्याची मागणी केली. या बाबतचे काम विभागाने मान्य केले असून तांत्रिक सल्लागाराकडून अंदाजपत्रक प्राप्त होताच वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी घेण्यात येणार असल्याचे प्रकल्प संचालक यांनी सांगितले.

मौजे बागपिंपळगाव ग्रामस्थांनी केलेल्या अमरण उपोषणाच्या संदर्भात चर्चा झाली. याठिकाणी नदी व कॅनॉल लगत सेवा रस्ता व शेतकऱ्यांसाठी पुल तयार करण्याकरीता विभागाने स्वतंत्र सल्लागाराकडून सर्व्हेक्षण सुरु केले आहे. सर्व्हेक्षणाचा अहवाल प्राप्त होताच याठिकाणी पुढील कामाचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रकल्प संचालक यांनी दिले.

राष्ट्रीय महामार्गावरून मौजे आगरनांदुर येथे जाण्यासाठी मोठ्या वळण रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे महामार्गावर आगरनांदुर जोडरस्त्या लगत मध्यम उघडणे (Medium Opening) च्या कामास मान्यता मिळाली आहे.

मौजे बागपिंपळगाव ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनुसार महामार्गालगतची अडचणीची ठरणारी कृषी विद्युत वाहिनी तात्काळ बदलून त्याची क्षमता वाढवून देण्याचे निर्देश प्रकल्प संचालकांनी दिले.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रकल्प संचालक श्री. अमरीश मानकर यांच्यासह व्यवस्थापक श्री. संघर्ष मेश्राम, साईट इंजिनिअर अनिकेत कुलकर्णी, आशिष देवटकर यांच्यासह सरपंच रामेश्वर जगताप, प्रविण तोडकर, पांडुरंग शेंडगे यांच्यासह बागपिंपळगाव आणि शिदोड येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande