
अमरावती, 1 नोव्हेंबर (हिं.स.)
दोन दिवसांपूर्वीच भाजप नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र त्यांच्या निवासस्थानी स्पीड पोस्टने पोहोचले होते. आता त्यांचे पती व बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.ही धमकी प्रहार पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत डिक्कर यांनी सोशल मीडिया व सार्वजनिक वक्तव्यांद्वारे दिली आहे. त्यांच्या वक्तव्यांत आमदार रवी राणा यांना उद्देशून मैदानात उतर, मी तुझे शीर कोयत्याने उडवण्याची ताकद ठेवतो, अशी हिंसक व आक्षेपार्ह भाषा करण्यात आली आहे. डिक्कर यांच्या या विधानावर युवा स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कडक पलटवार केला आहे.
पक्षाचे प्रवक्ते विनोद गुहे यांनी म्हटले की, प्रशांत डिक्कर हे मीडिया व सोशल मीडियावर चमकण्यासाठी हिंसेची भाषा करत आहेत. ही भाषा लोकशाहीची नसून अराजकतेची आहे, जी समाजासाठी धोकादायक आहे. अशी भडकाऊ विधाने सहन केली जाणार नाहीत; उलट, डिक्कर यांच्यावर कारवाई केली जाईल.
विनोद गुहे यांनी डिक्कर यांना उघड आव्हान देत सांगितले की, जर त्यांच्यात खरी हिंमत असेल तर आमदार रवी राणा यांना स्पर्श करून दाखवा; तेव्हा युवा स्वाभिमानींची ताकद कळेल. दरम्यान, राजापेठ पोलिसांनी प्रशांत डिक्कर यांच्या धमकीच्या विधानाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी