
पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या दोन्ही नार्कोटिक्स (अमली पदार्थविरोधी) पथकातील सर्व कर्मचाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या केल्या आहेत. प्रशासकीय कारणास्तव बदल्यांचे कारण दिले जात असले, तरी या बदल्यांबाबत मात्र वेगळीच चर्चा पोलिस दलात सुरू आहे. दोन्ही पथकांच्या ढेपाळलेल्या कामगिरीबरोबरच काही अर्थपूर्ण बाबी थेट पोलिस आयुक्तांच्या दालनापर्यंत पोहचल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता तेथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांची देखील शक्यता वर्तविली जात आहे.
शहरात होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्याची प्रामुख्याने जबाबदारी दोन्ही अमली पदार्थविरोधी पथकावर आहे. या पथकात तीसपेक्षा अधिक कर्मचारी काम करीत होते, तर दुसरीकडे अमली पदार्थतस्करीबाबत अमितेश कुमार यांची कठोर भूमिका आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरात गांजा, मेफेड्रॉन आणि इतर अमली पदार्थांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या या शहरातील कॉलेज परिसर, हॉस्टेल्स आणि उच्चभ्रू भागांमध्ये ड्रगचे जाळे झपाट्याने पसरत आहे. तरुणाईपर्यंत या व्यसनाचा शिरकाव होत असल्याने सामाजिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु