
पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.) दरवर्षी 1 जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या विजयस्तंभ शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संबंधित विभागांनी गती द्यावी तसेच भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक परिसराचा सुधारित बृहत विकास आराखडा तयार करावा अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्री. गजानन पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ 4) श्री. सोमय मुंडे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्री. भरतकुमार बाविस्कर, उपविभागीय अधिकारी हवेली श्री. यशवंत माने, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. किरण इंदलकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग (सदस्य सचिव) श्रीमती वंदना कोचुरे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्री. विशाल लोंढे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने कायमस्वरूपी सुविधा निर्माण करण्यासाठीचा आराखडा सादर केला. या आराखड्यात अंफी थिएटर, शौचालये, उद्यान, पार्किंग व्यवस्था, पोलीस नियंत्रण कक्ष, आर्ट गॅलरी-म्युझियम, मेडिटेशन हॉल तसेच नदी परिसराचा विकास या घटकांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सादर आराखड्याबाबत समाधान व्यक्त करत काही सुधारणा सुचवल्या असून, सुधारित आराखडा ३ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. तसेच आगामी 1 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या अभिवादन दिन कार्यक्रमाच्या तयारीसाठी आवश्यक तरतुदीबाबत सर्व विभाग प्रमुखांना आदेश दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु