
रायगड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)।महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) या पक्षाचा ६९ वा वर्धापन दिन सोहळा रायगड जिल्ह्यातील महाड येथील ऐतिहासिक चांदे मैदानावर ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, खासदार सुनील तटकरे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आरपीआय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे भूषवणार आहेत. राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे प्रस्ताविक करतील, तर कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे स्वागताध्यक्ष आणि रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड सहस्वागताध्यक्ष असतील.
मुळात हा सोहळा ३ ऑक्टोबरला होणार होता, परंतु अवकाळी पावसामुळे तो स्थगित करून ३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. महाडच्या ऐतिहासिक चवदार तळे क्रांतिभूमीत हा सोहळा आयोजित करण्यामागे डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सन्मान करण्याचा उद्देश आहे.या सोहळ्यात महिला, युवक, विद्यार्थी आघाड्या आणि राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिका निवडणुकांसंदर्भातील पक्षाची महत्त्वपूर्ण घोषणा होणार असल्याने सर्वांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.ना. रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांना महाड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके