
सोलापूर, 1 नोव्हेंबर (हिं.स.) : कार्तिकी यात्रेत विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन येणार्या लाखो भाविकांना विठुरायाच्या दर्शनासोबत चंद्रभागेचे स्नान केल्याशिवाय वारी पूर्ण केल्याचे समाधान मिळत नसते. त्यामुळे वारकरी संप्रदायात विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाएवढेच चंद्रभागेच्या पवित्र स्नानाला महत्त्व आहे. त्यामुळे चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसर कायम स्वच्छ राहील, स्नान करण्यासाठी आलेल्या भाविकांना चंद्रभागा पात्र निर्मळ दिसले पाहिजे, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. कार्तिक यात्रा नियोजनाबाबत के.बी.पी. कॉलेज पंढरपूर येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक धोत्रे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड