
पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)खरीप हंगाम २०२५-२६ साठी केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेत नाफेडमार्फत सोयाबीन, मुग आणि उडीद खरेदी होणार आहे. यासाठी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी ३० ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी केले.
‘नाफेड’मार्फत सोयाबीनला प्रति क्विंटल ५,३२८ रुपये, उडीदला ७,८०० रुपये आणि मुगाला ८,७६८ रुपये हमीभाव मिळणार आहे. बाजार समितीने शासनाकडे वाळलेल्या व स्वच्छ शेतमालाच्या हमीभाव खरेदीची मागणी केली होती. त्यानुसार ही योजना राबवली जात आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, आधार लिंक मोबाईल नंबर, २०२५-२६चा डिजिटल ७/१२ उतारा, पीकपेरा, बँक पासबुक (आधार व मोबाईल लिंक असलेले) यांच्या झेरॉक्स सादर कराव्यात. नोंदणी बाबालाल काकडे नीरा कॅनॉल सहकारी खरेदी विक्री संघ येथे करावी. १५ नोव्हेंबरपासून पुढील ९० दिवस खरेदी होईल. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल बारामती मुख्य बाजार आवारातील यांत्रिक चाळणी येथे खरेदी केला जाईल. शेतमाल एफएक्यू दर्जाचा, स्वच्छ आणि वाळलेला असावा, असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु