
पुणे, 1 नोव्हेंबर (हिं.स.)राज्यातील साखर कारखान्यांना ऊसगाळपावर आधारित विविध निधींच्या भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह लोकनेते गोपीनाथ मुंडे महामंडळासाठीच्या निधीतील काही हिस्सा भरण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शुक्रवारी साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आला. मात्र, त्यासाठी हमीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनकडून (विस्मा) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच निधी भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीत साखर कारखान्यांची सध्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे नमूद करण्यात आले होते.त्यावर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी आदेश जारी करून मुदतवाढ मंजूर केल्याचे स्पष्ट केले. नवीन आदेशानुसार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील प्रति मेट्रिक टन दहा रुपयांपैकी पाच रुपये आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे महामंडळ निधीतील प्रति मेट्रिक टन दहा रुपयांपैकी सात रुपये भरण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु