
रायगड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनचालक सुरेश (आण्णा) लाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, वाहनातील अनेक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे घडला असून, कर्जत तालुक्यात या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील भाविकांचा गट शेगाव दर्शनासाठी खासगी वाहनाने निघाला होता. पहाटेच्या सुमारास वाहनाचा ताबा सुटल्याने ते रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडकले. अपघात एवढा भीषण होता की वाहनाचे मोठे नुकसान झाले. गंभीर जखमी झालेल्या चालक सुरेश (आण्णा) लाड यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातात अन्य प्रवासी भाविकांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले आणि अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने हटवले. प्राथमिक तपासात वाहनाचा वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या दुर्दैवी घटनेने कर्जत परिसरात शोककळा पसरली असून, सामाजिक व धार्मिक वर्तुळातून सुरेश (आण्णा) लाड यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके