
रायगड, 1 नोव्हेंबर (हिं.स.)। देशाचे पहिले उपपंतप्रधान, लोहपुरुष आणि एकीचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने “सरदार @१५० एकता पदयात्रा” आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि जिल्हा सरचिटणीस व जयंती कार्यक्रम संयोजक प्रकाश बिनेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहसंयोजक सुशिल शर्मा उपस्थित होते. पत्रकार परिषदेत बोलताना अॅड. बिनेदार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत २०४७” या संकल्पनेनुसार देश सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करत आहे. ‘एक भारत, अखंड भारत’ या भावनेला बळकटी देण्यासाठी सरदार पटेल यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर “सरदार @१५० एकता पदयात्रा” राबवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत असून उत्तर रायगड जिल्ह्यात तीन दिवसीय एकता पदयात्रा काढण्यात येणार आहे. दररोज ८ ते १० किलोमीटर प्रवास असलेल्या या यात्रेत सुमारे एक हजार नागरिक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये भाजप कार्यकर्ते, एनएसएस, एनसीसी विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्था सहभागी होतील. यात्रेच्या समारोपात सामाजिक पथनाट्य सादर केले जाणार असून ४ नोव्हेंबर रोजी जिल्हा बैठकीत पदयात्रेच्या अंतिम तारखा निश्चित केल्या जाणार असल्याचे अविनाश कोळी यांनी सांगितले. तसेच नागरिकांनीही या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके