
हिंगोली , नोव्हेंबर (हिं.स.) वंदे मातरम गिताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त तालुकास्तरीय कार्यक्रम आयोजनाचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा घेतला. येत्या 7 नोव्हेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त, शिक्षणाधिकारी (प्राथमिक माध्यमिक), जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना), गटशिक्षणाधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, पुरातत्त्व विभागाचे समन्वयक, जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यामध्ये तालुकानिहाय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये, कौशल्य विद्यापीठ व कौशल्य विकास केंद्र, शासकीय, खाजगी माध्यमिक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच महिला बचत गट, गडकिल्ले संवर्धन संस्था व विविध सामाजिक संस्थांतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे. या कालावधीत देशभक्तीपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम यासारखे विविध कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सर्व विभागांना कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सूचना दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis