
अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.)
पावसाळा अचानक बेपत्ता होताच मध्य प्रदेशातून थंड वाऱ्याने मेळघाटात दस्तक दिल्याने मेळघाटवासीयांचा जीव गारठला आहे. रविवारला सकाळी न्यूनतम पारा ११ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आला. त्यामुळे शीतलहर आता मेळघाटात कहर करणार असल्याची चिन्हे दिसत आहे. मध्य प्रदेशातील इंदौर, खंडवा आणि बुरहानपूर या शहरांकडून धारणीत थंड हवेने शिरकाव करताच मेळघाटला थंडीचा फटका बसला आहे. थंडी सुरु झाल्याने शेतकरी मात्र सुखावलेला आहे, कारण आता अवकाळी पावसाचा धोका टळलेला आहे. रब्बी पिकांची पेरणी आता आटोपली असून खरीप पिके गमावलेल्यांना हरभरा, गहू आणि तुर पिकांची आस लागलेली आहे. दोन दिवस तापमान ११ अंशापर्यंत घसरल्याने धारणी गारठले पण, राजकीय वातावरण नगर पंचायत निवडणुकीमुळे तापत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी