
अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.) | अमरावती कारागृहात अँड्राईड मोबाईल मिळालेल्या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर देखल घेत कारागृह अधीक्षकाला तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कारागृह अधीक्षक याप्रकरणात काय अहवाल सादर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी तरबेज याच्याजवळ एक नाही तर तीन अँड्राईड मोबाईल मिळाल्याने कारागृह प्रशासन खळबळून जागे झाले आणि दुसऱ्या दिवशी कारागृह दक्षता समितीच्या अधिकाऱ्यांनी कारागृहाची पाहणी केली. तसेच महानिरिक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे येथील पथकानेसुध्दा कारागृहाची पाहणी केली.
तेव्हा संबंधित बंदीजवळ आणखी एक मोबाईल मिळाला. त्यामुळे कारागृहातील अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. तसेच कारागृह दक्षता समितीचे अध्यक्ष पोलीस आयुक्त अरविंद वावरिया यांच्या तपासणीत बरेच मुद्दे कैद्यानी मांडले तसेच पैसे घेतल्याचा आरोपसुध्दा काही कैद्यांनी केला.
त्यामुळे पोलीस आयुक्तांनी संबंधित प्रकरणाची चौकशी गुन्हेशाखेच्या पथकाला दिली. परंतु गुन्हेशाखेच्या तपासात अद्यापही काही ठोस माहिती समोर आली नाही. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी याघटनेची गंभीर दखल घेत कारागृह अधीक्षकाला संबंधित प्रकणाचा खुलासा मागितला असून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कारागृह अधीक्षक कशा पध्दतीचा अहवाल पाठवितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी