
बीड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। सुमारे ९ वर्षानंतर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर पालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी आज सोमवारपासून सुरु होणार आहे.
बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंत्री पंकजा मुंडे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आढावा घेणार आहेत त्यासोबत भारतीय जनता पक्षाला बीड जिल्ह्यात नगरपालिकेमध्ये यश मिळावे यासाठी भाजप नेते देखील कामाला लागले आहेत दुसरीकडे अजून कोणत्याही पक्षात युती किंवा आघाडी ठरलेली नाही
आजपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. दुसरीकडे अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली तरी अद्याप जिल्ह्यात महायुती व महाविकास आघाडी यांचा एकत्रित लढायचे अथवा नाही, त्याचा फॉर्म्युला काय असेल, कुठल्या जागा कुणाला याचा निर्णय झालेला नाही.
त्यामुळे सर्वांनीच स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. जिल्ह्यात बीडसह गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, परळी आणि धारुर या सहा नगर पालिका आहेत. बीड जिल्हा हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. नगर पालिकेच्या चाव्या आपल्याच हाती रहाव्यात यासाठी सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. बीडमध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवार यांची राष्ट्रवादी असाच सामना असेल. असे असले तरी महायुती म्हणून भाजप, शिवसेना यांनाही राष्ट्रवादी सोबत घेते की हे दोन्ही पक्षही स्वतंत्र लढतात याकडे लक्ष आहे. अद्याप तरी युतीचा निर्णय न झाल्याने तिनही पक्षांनी आपापली तयारी सुरु केली आहे
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
दरम्यान, बीड शहरात भाजप स्वबळाचा नारा देत असला आणि भाजपला मानणारा वर्गही बीड शहरात असला तरी प्रत्यक्षात भाजप इथे पालिका निवडणुकीत प्रभावी ठरलेला नाही. शहरात भाजपला स्वतःच्या चेहऱ्यावर मते मिळवून देऊ शकेल असे नेतृत्व अद्याप नाही. तर शिवसेनेचे मागील काळात काही नगरसेवक होते मात्र त्यांची संख्या एक, दोन इतकीच होती. त्यामुळे शिवसेनाही शहरात प्रभावहीन आहे. आहे हीच अवस्था कॉंग्रेस व ठाकरेंच्या सेनेचीही आहे.
जिल्ह्यात केवळ गेवराई नगर पालिकेत राष्ट्रवादीच्या शितल दाभाडे व भाजपच्या गीता पवार यांच्यात लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. इथे इतर पक्षांचा फारसा प्रभाव नसल्याने ही सरळ लढत होईल. मात्र, माजलगाव, परळी, धारुर व अंबाजोगाईत उमेदवारांबाबत उत्सुकता कायम आहे
परळीत राष्ट्रवादी व भाजप यांच्यात युती होण्याची शक्यता आहे. मुंडे बहिण भाऊ विचार करुन लढतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे. पंकजा मुंडेंही यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले जाते परंतु, कार्यकर्त्यांनी मात्र भाजपने स्व बळावर परळी पालिका लढावी असा आग्रह धरलेला आहेबीडमध्ये योगेश क्षीरसागर विरुद्ध आ. संदीप क्षीरसागर अशीच लढाई असेल.
--------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis