
अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.) | भातकुलीतील एका गोदामात रेशनच्या तांदळाचा सुमारे ८० क्विंटल अवैध साठा आढळून आला आहे. भातकुली तहसीलच्या अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला.भातकुली तहसिलमधील निरीक्षण अधिकारी मोनाली प्रमोद भोवरे यांनी नुकतीच ही कारवाई केली.
भातकुलीत आशिर्वाद मंगल कार्यालयाजवळ असलेल्या अमोल सुरेशराव महल्ले (३५) यांच्या गोदामात तांदळाचा अवैध साठा आढळून आला. ८० क्विंटल असलेल्या या रेशनच्या तांदळाची किंमत ३ लाख ५२ हजार रुपये आहे. जप्त केलेला तांदळाचा साठा विलासनगरातील शासकीय गोदामात ठेवण्यात आला.
दुपारी १२ : ४५ ते संध्याकाळी ६ : १५ वाजेपर्यंतही कारवाई सुरु होती. तांदळाच्या साठ्याबाबत कोणताही परवाना, बिल आरोपीजवळ आढळून आले नाही. तसेच हा तांदूळ प्रथमदर्शनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा असल्याचे निदर्शनास आले. निरिक्षण अधिकारी मोनाली भोवरे यांच्या तक्रारीवरुन भातकुली पोलिसांनी आरोपी अमोल महल्ले विरुध्द गुन्हादाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी