
अमरावती, 10 नोव्हेंबर (हिं.स.) अमरावतीवरून मोर्शीकडे जाणाऱ्या एका स्कार्पिओ वाहनाला अचानक आग लागल्याने काही काळ राष्ट्रीय महामार्गावर चांगलाच गोंधळ उडाला. क्षणांतच वाहनाने पेट घेतला आणि काही मिनिटांतच संपूर्ण स्कार्पिओ जळून खाक झाली. या घटनेने “राष्ट्रीय महामार्गावर द बर्निंग कार”चा थरार पहायला मिळाला.
वाघोली ते डवरगाव दरम्यान हा प्रकार घडला.घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. प्रवासादरम्यान स्कार्पिओच्या इंजिन भागातून धूर निघू लागल्याचे चालकाच्या लक्षात येताच वाहन थांबविण्यात आले, पण काही क्षणांतच आग भडकली. पाहता पाहता संपूर्ण वाहनाला आग लागली आणि परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहन पूर्णपणे जळून कोळसा झाले आहे. दरम्यान, या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावरून जाणारे वाहनचालक थराराने स्तब्ध झाले होते. घटनेमुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.सध्या या घटनेचा पुढील तपास माहुली जहागीर पोलिस ठाण्याचे ठाणेदार करीत आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाहनात शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी